आरोपींचे ‘मौन’ ठरले खुनाचा पुरावा !

वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

2 Min Read

पुणे : घरात झोपलेल्या वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला झाला असताना त्याची आपल्याला कल्पनाच नव्हती, असा आरोपींचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. घटनेचे स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी आरोपींची असताना त्यांनी बाळगलेले मौन हे प्रबळ परिस्थितीजन्य परावा ठरते, असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायालयाने वृद्ध महिलेच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी गावातील विरोधकांना खोट्या खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कुटुंबातील महिलेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र हिवसे यांनी आजिनाथ ठानलाल भोसले (४०) आणि आकाश शिवराम चव्हाण (२९, दोघे रा. वाडे बोल्हाई, खुटाळे वस्ती) यांना जन्मठेप आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ही घटना २५ जून २०१६ रोजी घडली होती. आरोपींच्या हल्ल्यात मांगी भोसले यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा आढळल्या. आजिनाथ भोसले याने पोलिसांना घटनेची माहिती देताना आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यास सांगितले होते. मात्र, तपासादरम्यान हा खून गावातील विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या कटातून करण्यात आल्याचे समोर आले.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून आरोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी दहा साक्षीदार तपासले. आरोपींच्या कपड्यांवर तसेच लोखंडी रॉडवर मानवी रक्ताचे डाग आढळल्याचे पुराव्यातून स्पष्ट झाले.

‘हल्ल्याची कल्पना नव्हती’ हा दावा फेटाळला

बचाव पक्षाने हा खटला राजकीय दबावातून दाखल करण्यात आल्याचा, तसेच आरोपी पारधी समाजातील असल्याने गावकऱ्यांनी त्यांना खोटे अडकविल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला.

वृद्ध महिला आरोपींच्या घरातच झोपलेली असताना तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला. गंभीर जखमा झाल्यानंतर तिच्याकडून आरडाओरड किंवा झटापट होणे स्वाभाविक आहे. असे असताना घरात झोपलेल्या आरोपींना हल्ल्याची कोणतीही कल्पना नव्हती, हा दावा विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

घरात घडलेल्या घटनेचे समाधानकारक स्पष्टीकरण आरोपींकडून अपेक्षित असताना त्यांनी बाळगलेले मौन हे त्यांच्या विरोधातील प्रबळ परिस्थितीजन्य पुरावा ठरते, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले.

You Might Also Like

Share This Article
Leave a Comment