नवी दिल्ली : एखाद्या सामान्य नागरिकाचा प्रश्न जेव्हा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचतो, तेव्हा तो केवळ दोन पक्षांमधील वाद राहत नाही; त्यातून अनेकदा संविधानाचा अर्थ, नागरिकांच्या अधिकारांची मर्यादा आणि राज्यसत्तेच्या अधिकारांची सीमा निश्चित होते. १९५० मध्ये संविधान लागू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केवळ अपील ऐकणाऱ्या न्यायालयाची भूमिका निभावली नाही; न्यायालयीन पुनरावलोकनाच्या माध्यमातून संविधानाच्या सर्वोच्चत्वाची कल्पना अधिक दृढ केली. आजही त्याच भूमिकेची नवी परीक्षा डिजिटल युग, वैयक्तिक स्वातंत्र्य, तंत्रज्ञान, पर्यावरण, आर्थिक व्यवहार आणि फौजदारी न्यायव्यवस्थेच्या प्रश्नांत होत आहे.
भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात केशवानंद भारती प्रकरणाला विशेष स्थान आहे. १९७३च्या या निर्णयातून ‘मूलभूत रचना’ सिद्धांत पुढे आला आणि संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार असला तरी संविधानाची मूलभूत चौकट नष्ट करता येणार नाही, हा महत्त्वाचा न्यायिक सिद्धांत विकसित झाला. त्यानंतर मेनका गांधीपासून गोपनीयतेच्या अधिकारापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत अधिकारांचा अर्थ व्यापक केला. न्यायालयीन पुनरावलोकन ही त्यामुळे केवळ कायदेशीर प्रक्रिया न राहता नागरिक आणि राज्य यांच्यातील घटनात्मक संतुलनाची यंत्रणा बनली.
आजचा न्यायिक पट मात्र अधिक गुंतागुंतीचा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्रावे, ऑनलाइन फसवणूक, डेटा संरक्षण, सोशल मीडिया, आर्थिक गुन्हे आणि बदलते तंत्रज्ञान यामुळे न्यायालयासमोर पारंपरिक कायद्यांच्या पलीकडील प्रश्न उभे राहत आहेत. सप्टेंबर २०२६मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर राज्याशी संबंधित प्रकरणांसह मोठ्या संख्येने नवी प्रकरणे व आदेश नोंदवले गेले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा रोजचा न्यायिक पट किती व्यापक झाला आहे, याची कल्पना येते.
न्यायालयीन प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विलंब, न्याय मिळण्यास लागणारा वेळ वाढला तर न्यायाच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. अलीकडील चर्चेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविणे आणि न्यायालयीन प्रलंबितता कमी करण्याच्या उपायांवरही भर दिला जात आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयातील प्रतिनिधित्व आणि विविधतेचा प्रश्नही सार्वजनिक चर्चेत आहे.
जगातील सर्वोच्च न्यायालयांच्या इतिहासाकडे पाहिले तर अमेरिकेतील Brown v. Board of Educationने वांशिक विभाजनाच्या प्रश्नावर संविधानाच्या समानतेच्या तत्त्वाला नवा अर्थ दिला; दक्षिण आफ्रिकेच्या घटनात्मक न्यायालयाने वर्णभेदानंतरच्या लोकशाही व्यवस्थेत अधिकारांच्या संरक्षणाची महत्वाची भूमिका बजावली. भारताची वाटचाल वेगळी असली तरी एक समान धागा दिसतो. न्यायालये केवळ कायद्याचा शब्दशः अर्थ सांगत नाहीत, बदलत्या समाजात संविधानाची मूल्ये कशी जिवंत ठेवायची, याचीही परीक्षा घेतात.
मात्र न्यायालयाकडून प्रत्येक सामाजिक किंवा प्रशासनिक प्रश्नाचे उत्तर अपेक्षित ठेवणेही योग्य नाही, धोरणनिर्मिती ही प्रामुख्याने विधिमंडळ आणि कार्यपालिकेची जबाबदारी आहे. न्यायालयाचे काम घटनात्मक मर्यादा, मूलभूत अधिकार आणि कायद्याचे पालन यांची कसोटी लावणे आहे. या सीमारेषेचे भान न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेसाठी महत्त्वाचे आहे. आज सर्वोच्च न्यायालयासमोर त्यामुळे दोन परस्परपूरक आव्हाने आहेत. न्याय मिळण्याची गती आणि न्यायाच्या गुणवत्तेची हमी, तंत्रज्ञानाचा वापर वाढला तरी मानवी विवेकाची जागा घेता येणार नाही, डिजिटल पुरावा वाढला तरी त्याची विश्वसनीयता तपासावीच लागेल. कायदे बदलले तरी संविधानाची मूलभूत मूल्ये बदलत नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाचा खरा अर्थ त्याच्या इमारतीत नाही; तो नागरिकाला मिळणाऱ्या घटनात्मक संरक्षणात आहे. राज्यशक्ती कितीही मोठी असो, नागरिकाचा अधिकार त्यापेक्षा मोठा असू शकतो. ही लोकशाहीची जाणीव न्यायालय जिवंत ठेवते. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयापुढील प्रत्येक प्रकरण हे केवळ दोन पक्षांचे प्रकरण नसते, अनेकदा ते ‘राज्य किती पुढे जाऊ शकते आणि नागरिकाचा अधिकार कुठे सुरू होतो?” या मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधत असते.


