पुणे: तिकिटे मिळण्यासाठी आता प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयातील उपकोषागार विभागामार्फत व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर याबाबतची प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे.
नोटरी (भारत सरकार) तथा नोटरी प्रॅक्टिश्नर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा (ग्रामीण) शाखेचे अध्यक्ष ॲड. दिपक संभाजी चौधरी पाटील यांनी ३ जून २०२६ रोजी याबाबत महसूल विभागाकडे संदर्भ अर्ज केला होता. त्यावर महसूल मंत्र्यांच्या निर्देशानुसार शासन पृष्ठांक क्रमांक मंत्री/महसूल/जनरल/११६६५/२०२६, दि. ८ जून २०२६ अन्वये सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी क्रमांक ५, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी प्रवीण देशपांडे यांनी ७जुलै २०२६ रोजी कोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय, पुणे जिल्हा यांच्याकडे आदेशपत्र जा.क्र. का.५/मुद्रांक/सं.क्र.१५१/२०२६/४३९ अन्वये पुढील कार्यवाहीसाठी पत्र पाठविले आहे. या प्रक्रियेमुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व तालुक्यांमधील तहसील कार्यालयांच्या उपकोषागार विभागामार्फत नोटरी वकिलांना शासनाकडून नोटरी तिकिटे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नोटरी वकिलांना तिकिटांसाठी जिल्हा कोषागार कार्यालय तसेच तहसील कार्यालयातील उपकोषागार कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. दरम्यान, संबंधित आदेशपत्राची प्रत प्रत्येक नोटरी वकिलाने आपल्या जिल्ह्यातील कोषागार कार्यालय तसेच तालुक्यातील उपकोषागार कार्यालयात सादर करून नोटरी तिकिटे उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन ॲड. दिपक संभाजी चौधरी पाटील यांनी केले आहे.


