पुणे : “निरोगी व्यक्ती ही निरोगी समाजाची पायाभरणी आहे. त्यामुळे आरोग्याला जीवनातील सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे,” असा सूर Health to Happiness: A Holistic Wellness Guide to Living Strong, Happy, Medicine Free in Every Moment या ॲड. कविता एन. सोळुंके लिखित पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.
अखंड धावपळ, वाढता ताण, प्रक्रियायुक्त अन्न आणि डिजिटल उपकरणांचा अतिवापर यामुळे आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असताना, आरोग्याकडे सर्वंकष दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. भावनिक, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि डिजिटल आरोग्य या पाच अंगांचा समतोल साधत निरोगी जीवनशैली कशी विकसित करता येईल, याचे मार्गदर्शन पुस्तकात करण्यात आले आहे. पुस्तकात भावनिक खाण्याची कारणे, अन्नाच्या प्रलोभनामागील मानसशास्त्र, पोषण, झोप, व्यायाम, ताणनियंत्रण, स्क्रीन टाइम आणि डिजिटल सवयी यांचा व्यावहारिक पद्धतीने विचार करण्यात आला आहे. Craving Management Worksheet, दैनंदिन व साप्ताहिक आरोग्य ट्रॅकर तसेच कृती आराखड्यांच्या माध्यमातून वाचकांना स्वतःच्या सवयी समजून घेऊन त्यात टप्प्याटप्प्याने बदल करण्याची दिशा देण्यात आली आहे.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या पुस्तकाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यांच्या प्रस्तावनांमधून आरोग्य, सामाजिक जीवन आणि आध्यात्मिकतेतील परस्परसंबंध अधोरेखित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, कायदेतज्ज्ञ, आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती आणि पुस्तकप्रेमी उपस्थित होते. ॲड. कविता एन. सोलुंके यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट करताना आरोग्य हा ‘नंतर पाहू’ असा विषय न ठेवता तो दैनंदिन जीवनाचा केंद्रबिंदू करण्याचे आवाहन केले.


