पुणे: कोथरुड पोलिसांनी कारवाईचा धडाका लावत एकीकडे बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे, तर दुसरीकडे एआरएआय टेकडीवर झालेल्या १७ वर्षीय मुलाच्या निर्घण खुनाचा अवघ्या दोन तासांत उलगडा करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पहिली कारवाई: २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह तरूण गजाआड
केळेवाडीतील कुमार प्रॉपर्टीजजवळील पंपिंग स्टेशनच्या मोकळ्या जागेत एक जण पिस्तूल विक्रीसाठी आला असल्याची गुप्त माहिती कोथरुड पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली होती. पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केल्यानंतर तातडीने सापळा रचून प्रेम देवेंद्र साळुंखे (वय २१, रा. दत्तवाडी, पुणे) याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला २ पिस्तुले आणि खिशात २ जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करत त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घुले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दुसरी कारवाई: टेकडीवरील खुनाचा अवघ्या २ तासांत छडा
एआरएआय टेकडीवर १९ ऑगस्ट रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता मयत मुलगा निल विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरुड) असल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची ५ वेगळी पथके तयार करून शोध सुरू करण्यात आला. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयताच्याच दोन अल्पवयीन मित्रांनी हा खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी चक्रे फिरवत एकाला राहत्या घरातून तर दुसऱ्याला मार्केटयार्ड परिसरातून अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून खुनात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोठे पुढील तपास करत आहेत.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, प्रभारी पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, पोलीस उपआयुक्त सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक अनिल माने, सुनील कारोठे आणि तपास पथकाने केली.


