पुणे, प्रतिनिधी:
राज्यातील तीन आणि पाच वर्षांच्या विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे तिसऱ्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सुधारित प्रक्रियेनुसार प्रवेशप्रक्रियेत १३० नवीन महाविद्यालयांची भर पडली असून, त्यामुळे तब्बल ७ हजार ६२० नवीन जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. या वाढीमुळे दोन्ही अभ्यासक्रम मिळून साडेसात हजारांहून अधिक जागांची लक्षणीय वाढ झाली आहे.
सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमासाठी सुधारित जागा वाटप जाहीर करण्यात आले आहे.
प्राधान्यक्रम नोंदवण्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दोन्ही अभ्यासक्रमांसाठी पसंतीक्रम भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर एकूण ३३ हजार २०३ विद्यार्थ्यांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवले आहेत. यामध्ये तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमासाठी २३ हजार ३९१ विद्यार्थ्यांनी, तर पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ९ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत.
महाविद्यालये आणि उपलब्ध जागांचा तपशील
३ वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी
सुरुवातीला या अभ्यासक्रमासाठी ९३ महाविद्यालये आणि १० हजार १०५ जागा उपलब्ध होत्या. यात आता ७० नवीन महाविद्यालयांची वाढ झाली असून, एकूण महाविद्यालयांची संख्या १६३ झाली आहे. यामुळे ४ हजार ७१० नव्या जागांची भर पडून एकूण उपलब्ध जागा १४ हजार ८१५ झाल्या आहेत.
५ वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी
सुरुवातीला ५६ महाविद्यालयांमध्ये ५ हजार ९५५ जागा होत्या. त्यात ६० नव्या महाविद्यालयांची भर पडल्याने एकूण महाविद्यालये ११६ झाली आहेत. या फेरीत २ हजार ९१० नवीन जागा उपलब्ध झाल्याने या अभ्यासक्रमासाठीची एकूण जागांची संख्या ८ हजार ८६५ वर पोहोचली आहे.
राज्यात प्रवेशप्रक्रियेत नव्याने १३० महाविद्यालये सहभागी झाल्याने एकूण विधी महाविद्यालयांची संख्या २७९ झाली आहे. या वाढीमुळे एकूण ७ हजार ६२० नवीन जागांसह आता राज्यभरात विधी शिक्षणासाठी २३ हजार ६८० जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.


