मुंबई : न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. ते मुंबई उच्च न्यायालयाचे ५० वे मुख्य न्यायमूर्ती ठरले आहेत. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लोकभवन येथे झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्रिमंडळातील काही सदस्य तसेच उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठातील न्यायमूर्ती यावेळी उपस्थित होते. अलाहाबाद उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती असलेल्या त्रिपाठी यांच्या नावाची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या महिन्यात शिफारस केली होती. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्यांची नियुक्ती झाली.
न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी १९९० मध्ये लखनऊ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. ११ जानेवारी १९९२ रोजी त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली. दिवाणी प्रकरणांमध्ये त्यांनी प्रामुख्याने वकिली केली. ऑक्टोबर २००७ पासून त्यांनी उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य स्थायी वकील म्हणून काम पाहिले. २७ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. १० एप्रिल २०१५ रोजी ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले. त्यांच्या न्यायालयीन कारकिर्दीचा अनुभव आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नेतृत्वाला लाभणार आहे. न्यायमूर्ती त्रिपाठी २० जून २०२८ रोजी निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती त्रिपाठी यांच्या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयाला पूर्णवेळ मुख्य न्यायमूर्ती मिळाला आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रलंबित खटल्यांचा निपटारा, न्यायालयीन प्रशासनातील गतिमानता आणि न्यायप्रक्रियेतील सातत्य या बाबींना महत्त्व राहणार आहे.


