पुणे: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर पुणेकर एकवटले आहेत. ‘उत्सवाला विरोध नाही; मात्र डीजेच्या उन्मादाला विरोध आहे,’ अशी भूमिका घेत नागरिकांनी गुडलक कॅफे चौक ते अभिनव चौक आणि शनिवारवाडा असा शांततापूर्ण मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण आणावे आणि गणेशोत्सव पारंपरिक व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा, अशी मागणी करण्यात आली. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असा आग्रह वकिलांनीही धरला आहे.
ध्वनिप्रदूषणाविरोधात नागरिकांचा एल्गार
गणेशोत्सव हा श्रद्धा, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. मात्र मोठ्या आवाजाच्या स्पर्धेमुळे उत्सवाचे स्वरूप बदलत चालल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. डीजेच्या आवाजाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेता उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. उत्सव नियमांच्या चौकटीत आणि शिस्तीने झाला तर त्याचे समाधान वेगळे असेल, असे ॲड. परिमल देशमुख यांनी सांगितले.
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
सरसकट डीजे बंदीपेक्षा ध्वनिमर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. नियम मोडणाऱ्यांवर मोठा दंड आकारावा; त्याचवेळी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संवादातून प्रश्न सोडवावा, असे ॲड. प्रसाद निकम यांनी सांगितले. ध्वनिप्रदूषणाचा त्रास सर्वसामान्यांना होतो, याची जाणीव मंडळांच्या कार्यकर्त्यांना करून देणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘डीजेला विरोध नाही; मात्र आवाजाची पातळी प्रशासनाने निश्चित केलेल्या मर्यादेतच असावी,’ असे ॲड. अक्षय निचित यांनी स्पष्ट केले. उत्सवाच्या नावाखाली रस्त्यावर मंडप उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याचीही मंडळांनी काळजी घ्यावी. उत्सवाबरोबरच सार्वजनिक शिस्तीचा आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी मंडळांची आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन
डीजे आणि ध्वनिक्षेपकांचा वापर कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार झाला पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. मुख्य मिरवणूक मार्गावर सर्व मंडळांना सरसकट परवानगी देण्याऐवजी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी भूमिका ॲड. सचिन हिंगणेकर यांनी मांडली. गेल्या काही वर्षांत नव्या मंडळांची संख्या वाढल्याने मिरवणूक मार्गावरील व्यवस्थापनाचे आव्हानही वाढले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. उत्सवाच्या नावाखाली कानठळ्या बसविणारा आवाज करून आनंद साजरा करणे योग्य नाही. ध्वनिप्रदूषणाचा त्रास सर्वांनाच होत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सुजाण नागरिकांनी समाजाला दिशा दाखवावी. आधुनिकतेच्या नावाखाली परंपरेचे स्वरूप बिघडवण्याऐवजी रूढी-परंपरा जपत संयमाने उत्सव साजरा करण्याची गरज आहे, असे ॲड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी सांगितले. पुणेकरांचा विरोध गणेशोत्सवाला नसून ध्वनीच्या अतिरेकाला आहे. उत्सवाचा आनंद दुसऱ्याच्या शांततेची किंमत मोजून मिळता कामा नये, हीच नागरिकांची भूमिका आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचे नियम केवळ कागदावर न राहता त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. श्रद्धेचा उत्सव आनंद देणारा असावा; कानठळ्या बसविणारा नव्हे !


