नवी दिल्ली: व्यावसायिक नीतिमत्ता, नैतिकता आणि वकिलीतील गुणवत्ता जपण्यात बार कौन्सिलची भूमिका महत्त्वाची असून, केंद्रीय तसेच राज्य बार कौन्सिलने आपल्या कार्यपद्धतीचे आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी केले.
नवी दिल्ली येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या १३व्या दीक्षान्त समारंभात त्या बोलत होत्या. बार कौन्सिलला तिच्या सदस्यांचाच आदर मिळत नसेल, तर ही कायदे व्यवसायासाठी चांगली बाब नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायव्यवस्थेसमोरील प्रलंबित खटले, विलंब, वाढता खर्च आणि अनिश्चितता यांचा उल्लेख करून न्या. नागरत्ना यांनी या परिस्थितीत बारने न्यायव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी एकसंघ भूमिका मांडण्याची गरज व्यक्त केली. न्यायदानाची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी वकिलांनी व्यावसायिक शिस्त, नैतिकता आणि गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.


