MPSC प्रश्नसंच फुटला; चौघांना अटक

1 Min Read
MPSC लोगो, 'पेपर लीक' असा शिक्का असलेला दस्तऐवज आणि हातकडी घातलेले हात

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतील गोपनीय प्रश्नसंच बेकायदेशीररीत्या मिळवून त्याची प्रत इतरांना उपलब्ध करून दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आयोगातील तीन अधिकारी आणि खासगी अकादमीच्या संचालकासह चौघांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२२ मार्च २०२६ रोजी झालेल्या परीक्षेसाठी तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातील प्रश्न बेकायदेशीररीत्या मिळविण्यात आले. त्यातून स्वतंत्र प्रश्नसंच तयार करून तो इतर व्यक्तींना पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारामुळे आयोगाच्या गोपनीय परीक्षा प्रिक्रयेचा भंग झाल्याचा आरोप आहे.

गुन्हे शाखेच्या गुन्हे अन्वेषण, मालमत्ता कक्षाने दाखल केलेल्या गुन्ह्यात विश्वेश्वर दत्तात्रय नकाते (सहाय्यक कक्ष अधिकारी), अभिजित गणपतराव लेंडवे (अवर सचिव), गोपाळ भट्टू मराठे (सहाय्यक कक्ष अधिकारी) या MPSC अधिकाऱ्यांसह प्रविण दिलीप पाटील (संचालक, कौटिल्य अकादमी, नंदुरबार) यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणात अमृत नामदेव पाटील आणि लोकेश ऊर्फ गौरव राजेंद्र पाटील यांचाही सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अटक आरोपींना सत्र न्यायालयातील न्यायालय क्रमांक चारसमोर हजर केले असता, १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

प्रश्नपत्रिकेची गोपनीयता हीच परीक्षेच्या विश्वासार्हतेची पहिली अट आहे. तीच भेदली गेल्याने या प्रकरणातील संपूर्ण साखळी आणि प्रश्नसंच कुणाकुणापर्यंत पोहोचला, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

You Might Also Like

Share This Article
Leave a Comment