पुणे : विधी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, व्यावसायिक गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत पुण्यातील कायदेतज्ज्ञ व लवाद ॲड. विशाल काळे आणि ॲड. पल्लवी काळे यांना ‘लोकमत ग्लोबल पॉवर कपल अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. मॉरिशस येथे आयोजित ‘लोकमत वन वर्ल्ड समिट २०२६’मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मॉरिशसमधील ‘ले मेरिडियन इल मॉरिस’ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी, अन्न सुरक्षा व मत्स्यव्यवसाय मंत्री डॉ. अरविंद बुलेल, तसेच माहिती तंत्रज्ञान, दळणवळण व नवोपक्रम मंत्री डॉ. अविनाश रामतोहुल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
भारताकडून ‘लोकमत’ मीडिया समूहाच्या संपादकीय मंडळाचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. विजय दर्डा,महाराष्ट्र शासनाचे माजी कॅबिनेट मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, सामाजिक कार्यकर्त्या सपना मुनगंटीवार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग, YPO आफ्रिका रिजनचे चेअर अभयकुमार साळुंखे आणि राठी स्टील अँड मेटल प्रा. लि.चे संचालक उमेश राठी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
विधी व्यवसायातील व्यावसायिक कौशल्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेल्या या सन्मानामुळे पुण्याच्या विधी क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. “हा केवळ आमचा सन्मान नसून, विधी क्षेत्रात एकमेकांना साथ देत आणि नवीन पिढीला दिशा देत केलेल्या सामूहिक प्रवासाची पावती आहे. आमच्या प्रवासात पाठीशी उभे राहणारे सहकारी, मित्र आणि हितचिंतकांचे आम्ही मनापासून आभारी आहोत,” अशी भावना ॲड. विशाल काळे आणि ॲड. पल्लवी काळे यांनी व्यक्त केली.


