पुणे- राज्यातील तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या (एलएलबी) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची (कॅप) पहिली निवड यादी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या फेरीत राज्यातील १४ हजार ९४८ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. २०) ते शनिवारी (ता. २२) दरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
प्रवेशासाठी या अभ्यासक्रमाच्या राज्यभरातून ४८ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार ४०३ विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांचे पसंतीक्रम (ऑप्शन फॉर्म) भरले होते. त्यामुळे पहिल्या फेरीच्या जागा वाटपासाठी केवळ पसंतीक्रम भरलेल्या याच ४० हजार ४०३ विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आला आहे.
राज्यात तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमासाठी २१९ महाविद्यालयांमध्ये एकूण ११ हजार ३९६ जागा उपलब्ध आहेत. या उपलब्ध जागांच्या तुलनेत पहिल्या फेरीत १४ हजार ९४८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुदतीत प्रवेश निश्चित न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दावे पुढील फेऱ्यांसाठी गृहीत धरले जातील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत कागदपत्र पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


