पहिल्याच युक्तिवादात जामीन; आत्मविश्वासाने घडला वकिलीचा प्रवास !

3 Min Read
ॲड. विराज करचे यांचा औपचारिक पोर्ट्रेट फोटो, काळ्या ब्लेझरमध्ये, इमारतीसमोर उभे

कँटोन्मेंट कोर्टातील पहिल्या ‘मेन्शनिंग’पासून महाराष्ट्राबाहेरील न्यायालयांपर्यंत ॲड. विराज करचे यांची उल्लेखनीय वाटचाल…… वकिलीच्या पहिल्याच दिवशी न्यायालयासमोर उभे राहण्याची भीती… त्यानंतर काही दिवसांतच बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या जामिनासाठी न्यायालयात युक्तिवाद करण्याचे आव्हान! या आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जात न्यायालयाला कायदेशीर मुद्दे पटवून देत जामीन मिळवून देणारे ॲड. विराज बाबासाहेब करचे यांचा वकिलीचा प्रवास संघर्ष, धाडस आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी आहे.

बीसीएस, एलएलबी, डीसीसीएलचे शिक्षण घेतलेल्या ॲड.करचे यांनी २०१५ मध्ये लॉ कॉलेज, हडपसर येथून वकिलीचे शिक्षण पूर्ण करून बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली आणि सनद प्राप्त केली. पुणे कँप येथील कँटोन्मेंट कोर्टात ॲड. नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर म्हणून त्यांनी वकिलीची सुरुवात केली. पहिल्याच दिवशी जाधव यांनी त्यांना एका प्रकरणात न्यायालयासमोर ‘मेन्शनिंग’ करण्यासाठी उभे केले. मनात धाकधूक होती; मात्र आत्मविश्वासाने त्यांनी काम पूर्ण केले. तो पहिला क्षणच पुढील वकिलीच्या प्रवासाचा आत्मविश्वास ठरला.

वकिलीच्या सुरुवातीच्या काळातच आलेले पहिले गंभीर प्रकरण त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरले. ॲड. विशाल लोखंडे यांनी आळंदी पोलिस ठाण्यातील बलात्काराच्या गुन्ह्याची एफआयआर पाठवून जामिनासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. अनुभव कमी आणि प्रकरण गंभीर असल्याने सुरुवातीला ते काहीसे घाबरले. मात्र, त्यांनी ॲड. नरेंद्र जाधव यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर स्वतः बेल अर्जाचा मसुदा तयार करून तो खेड-राजगुरुनगर न्यायालयात दाखल केला.

प्रकरण सुनावणीस आले आणि त्यांचे नाव पुकारले गेले. सुरुवातीची भीती बाजूला सारत त्यांनी प्रकरणातील कायदेशीर मुद्दे आणि वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडली. युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला. वकिलीच्या पहिल्या मोठ्या परीक्षेत मिळालेले हे यश त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी देणारे ठरले. युक्तिवादानंतर एका ज्येष्ठ वकिलांनी, “बाळ, छान युक्तिवाद केला,” अशी दिलेली शाबासकी आजही त्यांच्या स्मरणात आहे.

त्यानंतर ॲड. करचे यांनी विविध स्वरूपाच्या अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयीन कामकाज केले. महाराष्ट्रातील विविध न्यायालयांसह महाराष्ट्राबाहेरही त्यांनी वकिली केली. विजापूर (कर्नाटक), अहमदाबाद (गुजरात), पोर्ट ब्लेअर (अंदमान-निकोबार) आणि इंदूर (मध्य प्रदेश) येथे जाऊनही त्यांनी प्रकरणांमध्ये युक्तिवाद केला आहे. वेगवेगळ्या न्यायालयांचा अनुभव आणि सातत्याने कायद्याचा अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या व्यावसायिक वाटचालीला व्यापक आयाम मिळाला.

सन २०२०-२१ मध्ये पुणे बार असोसिएशनच्या सदस्यपदी निवडून येत संघटनेच्या कामकाजात सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळाली. वकिलीच्या क्षेत्रात दशकभर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल २०२५ मध्ये ऐतिहासिक लाल महल येथे त्यांना ‘शिवसन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

ॲड. विराज करचे यांची वाटचाल नवोदित वकिलांसाठी एक महत्त्वाचा संदेश देते-वकिलीमध्ये पहिली भीती स्वाभाविक असते; पण अभ्यास, मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तीच भीती पुढे ताकद बनते. न्यायालयात उभे राहण्याची संधी मिळाल्यावर मागे न हटता कायद्याच्या कसोटीवर आपली बाजू मांडण्याची तयारी असेल, तर अनुभवाचा प्रत्येक दिवस वकिलाला अधिक सक्षम बनवतो.

“पहिल्या दिवसाची धडधड ते न्यायालयातील आत्मविश्वास” हा ॲड. करचे यांच्या प्रवासाचा खरा गाभा आहे.

You Might Also Like

Share This Article
Leave a Comment