पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीला घटस्फोट; पतीचा ‘एकतर्फी’ निकालाचा आरोप

2 Min Read

पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने एका प्रलंबित विवाह विच्छेदनाच्या (घटस्फोट) खटल्यात पत्नीच्या बाजूने निकाल दिला आहे. पतीकडून होणारी क्रूरता आणि छळ सिद्ध झाल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा विवाह विच्छेदीत करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, या निर्णयावर पती अतुल रमेशलालजी छाजेड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हा निकाल ‘एकतर्फी’ असल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण? अतुल छाजेड आणि त्यांच्या पत्नीचा विवाह १९ ऑगस्ट २०१३ रोजी झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच पतीकडून छळ सुरू झाल्याचा आरोप पत्नीने केला होता. पतीने शिवीगाळ करणे, नोकरीवर संशय घेणे, घरात कोंडून ठेवणे आणि शरीरसुखापासून वंचित ठेवणे असे गंभीर आरोप तिने केले होते. तसेच, गेल्या ११ वर्षांपासून पतीने तिचा त्याग केला असल्याचेही तिने प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते.

न्यायालयाचे निरीक्षण: न्यायालयाने आपल्या निष्कर्षामध्ये नमूद केले की, पतीने उलटतपासात दोघे ११ वर्षांपासून विभक्त राहत असल्याचे मान्य केले आहे. पत्नीला नांदायला आणण्यासाठी पतीने कोणतीही कायदेशीर नोटीस (Restitution of Conjugal Rights) पाठवली नव्हती. शरीरसुखापासून वंचित ठेवण्याबाबतच्या आरोपांवर पतीने कोणताही ठोस वैद्यकीय पुरावा सादर केला नाही. त्यामुळे पत्नीची बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.

पतीचा न्यायावर सवाल: या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अतुल छाजेड यांनी न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. छाजेड म्हणाले, “पत्नीच्या केवळ प्रतिज्ञापत्रातील निराधार आरोपांवर हा निकाल दिला गेला. मी न्यायालयात ६४ (ब) चे प्रमाणपत्र, व्हिडिओ-ऑडिओ पुरावे आणि वैद्यकीय अहवाल सादर केले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.” सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत, “पुराव्याशिवाय आरोप ग्राह्य धरु नयेत, असा नियम असताना कौटुंबिक न्यायालयाने त्याकडे दुर्लक्ष का केले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या अन्यायाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.चर्चेतील व्यक्ती: या खटल्यातील पती अतुल छाजेड हे यापूर्वी ‘पोटगीबंद आंदोलन’ आणि ‘कोर्ट में चमत्कार’ यांसारख्या विविध आंदोलनांमुळे चर्चेत राहिले आहेत. तसेच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यांमुळेही ते यापूर्वी प्रसिद्धीझोतात आले होते.

राज्यात सध्या ‘समान नागरी कायद्या’ची चर्चा सुरू असतानाच, ट्रिपल तलाकच्या वाढत्या तक्रारींनी कायदेशीर अंमलबजावणी आणि सामाजिक जनजागृतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

You Might Also Like

Share This Article
Leave a Comment