पुणे : गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा कठोर भूमिका घेतली आहे. प्लाझ्मा आणि प्रेशर मिडवर शंभर टक्के बंदी राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संपूर्ण ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
गणेशोत्सव आणि अन्य सण-उत्सव प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरे करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्लाझ्मा, प्रेशर मिड आणि लेसरमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत पोलिसांनी गणेश मंडळांशी चर्चा केली आहे. विसर्जन मिरवणुकीतील ध्वनियंत्रणाबाबतही मंडळांशी चर्चा सुरू असून, चार बेस आणि चार टॉपपेक्षा अधिक साउंड सिस्टिम न वापरण्याची भूमिका मंडळांनी मांडली आहे. मोकळ्या जागेतील स्थिर कार्यक्रमांसाठी सहा बेस आणि सहा टॉप वापरण्याची मागणी काही मंडळांनी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय चर्चेनंतर घेतला जाणार आहे. दरम्यान, मागील मिरवणुकीत सहा ठिकाणी प्लाझ्मा आणि प्रेशर मिडचा वापर आढळल्याने संबंधितांची संपूर्ण साउंड सिस्टिम जप्त करण्यात आली. पोलिसांनी एक हजारांहून अधिक ध्वनी चाचण्या घेतल्या असून, १४८ ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक डेसिबल आढळल्याने कारवाई सुरू केली आहे.
ढोल-ताशांवरही नजरढोल-ताशा पथकांच्या सरावामुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाला किती ढोल-ताशा पथके ठेवता येतील, यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. लक्ष्मी रोड आणि टिळक रोडवरील मिरवणुकीसाठी सुमारे १८० ते १९० मंडळांशी पोलिसांची चर्चा सुरू आहे.


