विधी क्षेत्रातील महामेरू : निर्भय वकिलीचा राम जेठमलानी

कायद्याच्या अक्षरापलीकडे न्यायाचा आत्मा शोधणाऱ्या वकिलाची अद्वितीय गाथा

4 Min Read

भारतीय विधिजगताच्या इतिहासात काही व्यक्ती केवळ यशस्वी वकील म्हणून नव्हे, तर एका मूल्यव्यवस्थेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. राम बुलचंद जेठमलानी हे त्यापैकी एक. बुद्धिमत्तेची धार, कायद्याचे सखोल ज्ञान, उलटतपासणीचे असामान्य कौशल्य आणि कोणत्याही दबावापुढे न झुकण्याचे धैर्य यामुळे त्यांनी भारतीय वकिलीवर अमीट ठसा उमटवला. त्यांची कारकीर्द ही केवळ प्रसिद्ध खटल्यांची यादी नाही; ती निर्भय वकिली आणि कायद्याच्या राज्यावरच्या अढळ विश्वासाची गाथा आहे.

१४ सप्टेंबर १९२३ रोजी अविभाजित भारतातील सिंध प्रांतात जन्मलेल्या जेठमलानीची बौद्धिक चमक बालपणापासूनच दिसून आली. अल्पवयात शिक्षण पूर्ण करून त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी विधी पदवी मिळवली. वकिलीची सनद मिळविण्याच्या वयोमयदिचा अडथळा त्यांच्या वाटेत आला; पण त्यांनी तो स्वीकारला नाही. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी त्या नियमाला आव्हान दिले आणि विशेष परवानगीने वयाच्या १८व्या वर्षी वकिलीला सुरुवात केली. अडथळा म्हणजे थांबण्याचे कारण नव्हे, तर कायद्याच्या माध्यमातून प्रश्न विचारण्याची संधी, हे त्यांच्या सुरुवातीच्या प्रवासातूनच दिसले.

कराचीतील वकिलीपासून सुरू झालेली कारकीर्द फाळणीच्या काळाने बदलून टाकली. भारतात आल्यानंतर हातात संपत्ती नव्हती; मात्र कायद्याचे ज्ञान आणि आत्मविश्वास होता. निर्वासितांच्या हक्कांसाठी त्यांनी न्यायालयीन लढा दिला. पुढे के. एम. नानावटी प्रकरणासह अनेक गाजलेल्या खटल्यांत त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली.

जेठमलानींच्या वकिलीचे वैशिष्ट्य त्यांच्या पुराव्यांच्या अभ्यासात होते. साक्षीदाराच्या जबाबातील सूक्ष्म विसंगती शोधणे, कागदपत्रांचे बारकाईने विश्लेषण करणे आणि नेमक्या प्रश्नांनी विरोधी बाजूची भूमिका तपासणे, ही त्यांची खासियत होती. न्यायालयात आवाजाची उंची नव्हे, तर युक्तिवादाची गुणवत्ता महत्त्वाची असते, हे त्यांनी सिद्ध केले.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे लोकप्रियतेच्या दबावापासून स्वतंत्र राहण्याची वृत्ती. एखाद्या आरोपीविरोधात समाजमत तयार झालेले असले, तरी त्याला सक्षम कायदेशीर बचाव मिळणे हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे, या भूमिकेवर ते ठाम राहिले. आरोपीचा बचाव करणे म्हणजे त्याच्या कथित गुन्ह्याचे समर्थन करणे नव्हे; तर न्यायप्रक्रियेचे संरक्षण करणे होय. हा धडा आजच्या काळात विशेष महत्त्वाचा आहे.

आज समाजमाध्यमांमुळे आरोप, प्रत्यारोप आणि ‘तत्काळ न्याय’ यांचे वातावरण क्षणार्धात तयार होते. न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच एखाद्याला दोषी ठरवले जाते. अशा वेळी वकिलाची भूमिका जनमतामागे जाण्याची नसून कायद्याच्या बाजुने उभे राहण्याची असते. जेठमलानींची कारकीर्द या तत्त्वाची जिवंत आठवण करून देते.

१९७५ ची आणीबाणी त्यांच्या सार्वजनिक जीवनातील निर्णायक पर्व ठरले. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आलेल्या संकटाविरोधात आवाज उठवला, लोकशाही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसते; नागरिकांचे स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था ही तिची मूलभूत शक्ती असते, हे त्यांनी अधोरेखित केले.

केंद्रीय कायदा व न्यायमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षपद त्यांनी अनेकदा भूषवले, विधी क्षेत्रातील संस्थात्मक प्रश्न, मानवी हक्क आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणांबाबत त्यांनी सातत्याने भूमिका घेतली. त्यामुळे त्यांचे योगदान न्यायालयीन कामकाजापुरते मर्यादित राहिले नाही.

आजच्या नव्या पिढीतील विधी पदवीधरांसाठी जेठमलानीच्या जीवनाचा सर्वांत मोठा संदेश कोणता? वकिली ही केवळ उपजीविकेची साधनव्यवस्था नाही; ती संविधान आणि न्यायव्यवस्थेप्रती असलेली जबाबदारी आहे. कलमांची माहिती असणे पुरेसे नाही; त्या कलमांमागील संविधानिक मूल्ये समजून घेणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल न्यायव्यवस्था यांचे युग आले असले तरी सखोल अभ्यास, तर्कशक्ती, पूर्वतयारी आणि नैतिक धैर्य यांना पर्याय नाही.

आज न्यायव्यवस्थेसमोर प्रलंबित खटले, न्याय मिळण्यास होणारा विलंब, न्यायालयीन खर्च आणि सामान्य नागरिकाचा न्यायव्यवस्थेपासून वाढणारा दुरावा अशी आव्हाने आहेत. अशा वेळी जेठमलानींच्या कारकिर्दीकडे केवळ भूतकाळ म्हणून पाहणे पुरेसे नाही. त्यांच्या निर्भयतेचा अर्थ वर्तमानात शोधावा लागेल.

कायद्यापुढे सत्ता मोठी नाही, जनमत न्यायालयापेक्षा मोठे नाही आणि लोकप्रियतेपेक्षा संविधान मोठे आहे, हा जेठमलानींच्या वकिलीचा गाभा होता. त्यांच्या स्मृतीला खरे अभिवादन म्हणजे त्यांच्या नावाचा गौरव करणे नव्हे; तर न्यायालयात उभे राहताना भीतीपेक्षा कायद्याला, लोकप्रियतेपेक्षा सत्याला आणि सोयीपेक्षा संविधानाला प्राधान्य देणे.

राम जेठमलानींची गाथा म्हणूनच संपलेली नाही. निर्भयपणे प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक वकिलाच्या आवाजात आणि न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक युक्तिवादात ती पुढे चालू राहते.

You Might Also Like

Share This Article
Leave a Comment